भुसावळ प्रतिनिधी । तू लठ्ठ आहे, तू मला आवडत नाही असे सांगून लग्नापुर्वीच भावी पतीसह त्याच्या आईकडून हुंड्यांचा पैशांची मागणी व लग्न मोडण्याच्या धमकी दिली. याला कंटाळून तरूणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
याबाबत कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कुर्हेपानाचे येथील माजी सरपंच रविंद्र नागपुरे हे आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. ६ मार्च रोजी त्यांची मुलगी रामेश्वरी हीचा भुषण पाटील (मूळचे रावेर, ह.मु. नाशिक) याच्यासोबत साखरपुडा झाला होता. दि. ११ मे रोजी लग्नाची तारीख निश्चित केली होती. लग्नात मुलाकडच्यांना हुंड्यात ३ तोळे सोने व ५० हजार रुपये रोख असे कबुल केले होते. भावी पतीकडून त्यांना हुंड्यातील सोने व पैशांची मागणी केली जात होती. हुंडा दिल्यानंतर देखील पती व सासूकडून त्रास दिला जात असल्याने तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
हुंड्याची रविंद्र नागपुरे यांनी कबुल केलेली रक्कम चार दिवसांपुर्वी त्यांना दिली होती. दरम्यान, भुषण पाटील हे जळगावात सोन्याचे दागिने खरेदीसाठी आले असतांनाच रविंद्र नागरपुरे यांनी आपल्या मुलीला सोबत घेवून जात रावेर येथे त्यांना हुंडा दिला.
नागपुरे कुटुंबिय हे शुक्रवारी शिरसोली येथे लग्नाला गेले असल्याने रामेश्वरी ही घरी एकटीच होती. दुपारी १२ वाजता रामेश्वरी जीमवरुन घरी आल्यानंतर ती वडीलांसोबत तीचे फोनवर बोलणे झाले. त्यानंतर तीने घरात कोणीच नसतांना छताला ओढणीने गळफास घेतला. पोलिसांनी तरुणीचा मोबाईल जप्त केला असता, शेवटचे बोलणे तिच्या वडीलांसोबत व तिच्या होणार्या पतीसोबत झाले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
होणार्या पतीकडून लग्नापुर्वीच हुंड्यासाठी त्रास दिला जात असल्याने त्याला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. दरम्यान, भुषण पाटील व त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. परंतु भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. यावेळी तरुणीच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट निवेदन दिले.