मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दि.०४ दिला आहे. हवामान विभागाचे म्हणणे आहे की, ५ ते ८ एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या भागात उष्ण आणि दमट परिस्थिती असू शकते, ज्यामुळे उष्णता वाढू शकते. IMD ने शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूरसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला. ५ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या भागात उष्ण आणि दमट हवामान राहील.
हवामान विभागाने सांगितले की, पुढील सहा दिवस वायव्य भारतात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे आणि दिल्लीतील तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. याचा परिणाम दक्षिण हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात होतो. या काळात मध्य आणि वायव्य भारतातील अनेक भागात कमाल तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. त्याचवेळी, ६ किंवा ७ एप्रिलपर्यंत, दिल्लीतील काही ठिकाणी दिवसाचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
या आठवड्याच्या सुरुवातीला, हवामान विभागाने म्हटले होते की एप्रिल ते जून या कालावधीत भारतात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे, मध्य आणि पूर्व भारत आणि वायव्य मैदानी भागात दिवसा तापमान अधिक उष्ण राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे भारतात एप्रिल ते जून दरम्यान चार ते सात दिवस उष्ण वारे वाहतात.