मुंबई : वृत्तसंस्था
देशातील बॉलिवूड क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक देशभक्तीपर चित्रपट केले. म्हणूनच त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने ‘भारत कुमार’ म्हणत. ते क्रांती आणि उपकार सारख्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते.
मनोजच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना दु:ख झाले आहे. सोशल मीडियावर, प्रत्येकजण ओल्या डोळ्यांनी त्यांच्या आवडत्या कलाकाराला निरोप देत आहे. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाबद्दल सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला आहे.
मनोज कुमार यांनी सहारा, चांद, हनीमून, पूर्वा और पश्चिम, नसीब, मेरी आवाज सुनो, नील कमल, उपकार, पत्थर के सनम, पिया मिलन की आस, सुहाग सुंदर, रेशमी रुमाल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मनोज कुमार यांनी १९५७ मध्ये फॅशन या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. १९६५ हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीसाठी एक मोठे परिवर्तनकारी वर्ष होते. या वर्षी प्रदर्शित झालेल्या शहीद चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला मोठा फायदा दिला. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. भूमिका कोणतीही असो, ते तिच्याशी पूर्णपणे जुळवून घेत गेले. मनोज कुमार यांचे चित्रपट केवळ हिट झाले नाहीत तर त्यांची गाणीही लोकांमध्ये लोकप्रिय झाली. उपकार या चित्रपटातील ‘मेरे देश की धरती’ हे गाणे प्रत्येकजण आजही गुणगुणते.