जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नाचणखेडा येथील विकास कामांचा ठेका घेवूनही काम न करणाऱ्या ठेकेदाराला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी गावाच्या विकासकामांसाठी लागणारे घनकचरा व्यवस्थापन साहित्य खरेदीसंदर्भात विरेंद्र कुमार पाटील याला कामाचा मक्ता दिला होता. या कामासाठीचे ५ लाख ५७ हजार १०० रुपये वीरेंद्र कुमार याने घेतले मात्र प्रत्यक्ष विकासकामांसाठी लागणारे साहित्य पुरवलेच नाही. त्यामुळे याप्रकरणी विरेंद्रकुमार राजेंद्र पाटील रा. मायादेवी मंदिरामागे महाबळ याच्याविरोधात पहूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच वर्षभरापासून संशयित वीरेंद्रकुमार हा फरार होता. संशयित जळगावातील भास्कर मार्केट परिसरात असल्याची गोपनीय माहिती शनिवारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयित वीरेंद्र कुमार याच्या भास्कर मार्केट परिसरातून मुसक्या आवळल्या त्याला पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.