जळगाव : प्रतिनिधी
जर तुला वाईन शॉपचा धंदा करायचा असेल तर, दररोज आम्हाला बिअर व महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा आमच्यासारखे कोणी वाईट नाही…. अशा शब्दात तिघांनी जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील वाईन शॉप मालकाला खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरात अमोल संतोष कोळी हे वाईन शॉप चालवतात. १ एप्रिल रोजी रात्री ९:४५ वाजता तीन जण वाईन शॉपवर आले. तसेच त्यांनी काही वस्तू घेतल्यानंतर अमोल कोळी याने संबंधितांकडून घेतलेल्या वस्तूचे पैसे मागितले. त्यावर आकाश पाटील, गंप्या ऊर्फ अक्षय राठोड (रा. पिंप्राळा), दीपेश ऊर्फ फॉक्सन पाटील (रा. मानराज पार्क या तिघांनी पैसे द्यायला नकार दिला. तसेच आमच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, आमचा रेकॉर्ड तुम्हाला माहिती नाही का…? असे सांगत, अमोल कोळी याला शिवीगाळ करत जर धंदा करायचा असेल तर दररोज बिअर व महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली.
अमोल कोळीला चॉपरने मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळदेखील केली. या प्रकरणी बुधवारी अमोल कोळी याच्या फिर्यादीवरून आकाश पाटील, दीपेश पाटील व अक्षय कोळी या तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांताराम देशमुख हे करत आहेत.