चाळीसगाव : प्रतिनिधी
नवसाचा कार्यक्रम आटोपून पातोंडा येथे परतणाऱ्यांची पीकअप व्हॅन गाडी कन्नड घाटाच्या पायथ्याशी उलटली. या भीषण अपघातात व्हॅनमधील चार जण जागीच ठार झाले तर जवळपास २५ जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कन्नड घाटाच्या पायथ्याची घडली.
मिलाल्लेया माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील नाना दामू माळी यांच्या नातीचा नवसाचा कार्यक्रम श्रीरामपूर भागात होता. त्यासाठी नातेवाईक व गावातील जवळपास ३० जण पीकअप व्हॅनने (एम. एच. १९ बीएम ३९४७) ने गेले होते. नवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पातोंडा गावाकडे सर्व जण परत येण्यासाठी निघाले. कन्नड घाट उतरत असताना शेवटच्या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पीक अप व्हॅन अचानक उलटली.
यामध्ये वाहनातील चौघांचा मृत्यू झाला तर इतर सर्व जण जखमी झाले. अपघात घडल्याचे लक्षात येताच रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांनी जखमींना रस्त्यावर आणले. काही वेळातच रुग्णवाहिका आल्यानंतर त्यातून जखमींना ग्रामीण रुग्णालयासह शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातावेव्ळी महामार्ग पोलीसांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी तात्काळ मदतकार्य केले.
मयतांमध्ये ज्यांच्याकडे नवसाचा कार्यक्रम होता ते नाना दामू माळी, सावित्रीबाई मधुकर माळी यांच्यासह गुढे येथील तरुण तसेच आणखीन एक जणाचा या अपघातात मृत्यू झाला. इतर दोघांची रात्री उशीरापर्यंत ओळख पटलेले नव्हती. जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश पातोंडा गावातील ग्रामस्थांसह महिलांचा समावेश आहे. याशिवाय पोहरे व गुढे येथील काही जण असल्याचे समजते.