जळगाव : प्रतिनिधी
रेल्वेमध्ये मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत व बनावट आदेश पाठवून सेवानिवृत्त गोकूळ युवराज पाटील (६०, रा. पिंप्राळा) यांची १३ लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी संजय नथ्थू कोळी (रा.जैनाबाद, जळगाव), राम नारायण नेवाडकर (रा. सिडको, नाशिक) व सतीश गोकूळ पाटील (रा. जुनोने, ता. अमळनेर) या तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून निवृत्त झालेले गोकूळ पाटील यांची मुलगी दीपाली हिचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून, तिच्या नोकरीसाठी पाटील हे प्रयत्न करीत होते. मार्च २०२३ मध्ये त्यांचे भाऊ मधुकर पाटील यांनी त्यांचे मित्र संजय कोळी याच्याशी भेट घालून दिली. तिला रेल्वेत ग्रुप सी या पदावर नोकरी लावून देतो, मात्र यासाठी १३ लाख रुपये लागतील, असे सांगितले. या सांगण्यावर विश्वास ठेवणू व्यवहार झाला. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
नोकरीसाठी वारंवार पैशाची मागणी होऊ लागल्याने गोकूळ पाटील यांनी सेवानिवृत्तीच्या रकमेतून संजय कोळी याला ८ मार्च २०२३ रोजी रोख एक लाख रुपये दिले. त्यानंतर नेवाडकर याने घरच्या पत्त्यावर ऑर्डर येईल असे सांगितले. त्यानुसार १८ मे २०२३ रोजी टपालाद्वारे नोकरीचे आदेश (ऑर्डर) आले. त्यात ३० जून ते ५ जुलै २०२३ दरम्यान संपूर्ण कागदपत्रांसह मुंबई येथे हजर राहण्याचे कळविण्यात आले. ऑर्डर मिळाल्यानंतर १८ मे २०२३ रोजी सतीश पाटील याच्या खात्यावर पाच लाख व २५ मे २०२३ रोजी मेवाडकर याच्या खात्यावर पाच लाख रुपये पाठविण्यासह सतीश पाटील याला रोख दोन लाख रुपये दिले. नोकरीचे आदेश आल्याने गोकूळ पाटील हे ३० जून २०२३ रोजी मुलीला घेऊन मुंबई डीआरएम कार्यालयात गेले. त्यावेळी नोकरीचे हे आदेश बनावट असल्याचे समोर आले. हे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याने पाटील यांनी नविचारणा केली. त्यावर तुमची नोकरी पक्की आहे, घाबरू नका, असे सांगितले.