छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा निमित्त आयोजित मेळाव्यात औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केले होते. यावेळी बोलताना औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिसली पाहिजे. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथे गाडला गेला. हा आमचा इतिहास. आम्ही कोणाला गाडले हे जगाला कळू द्या, असे राज ठाकरे म्हटले होते. तसेच तिकडे लहान मुलांच्या सहली गेल्या पाहिजेत असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले होते. त्यानुसार आज छत्रपती संभाजीनगर पदाधिकाऱ्यांनी शहरात बॅनर लावले आहेत.
राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात हे बॅनर लावले आहे. कालच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून यात पाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. औरंगजेबाच्या कबरीजवळ जर सजावट असेल तरी ती त्वरीत काढली जावी, यापुढे कुठलाही सरकारी खर्च येथे करायचा नाही, सर्व शाळांतील मुलांच्या शैक्षणिक सहली तिथे काढण्याचा आदेश काढण्यात यावा, तिथे एक बोर्ड लावण्यात यावा “आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला”, असे लिहिलेले असावे तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या यात करण्यात आल्या होत्या.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर झाला. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. सध्या सुरू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर हल्ला चढवला. औरंगजेबाला कुठे गाडले हे दाखवण्यासाठी शाळांतील मुलांच्या सहली काढा. खुलताबाद येथील जी कबर आहे ना, तिथली सजावट काढून टाका आणि तिथे मोठा फलक लावा, मराठ्यांना म्हणजे आम्हाला हरवायला आलेला औरंगजेब हा इथे गाडला गेला हे मुलांना दाखवा, असेही राज यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात कुंभमेळ्याबाबत राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती.