चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव-धुळे महामार्गावरील भोरस शिवारात मंगळवारी दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यात वडगाव लांबेचे माजी सरपंच प्रकाश निळकंठ पाटील (४५) व दुसऱ्या घटनेत देवांश दिनेश महाजन (४, चाळीसगाव) या दोघांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रकाश पाटील हे आपल्या दुचाकीने चाळीसगावकडून वडगाव लांबेकडे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत १ रोजी सायंकाळी ७वाजता धुळे येथून चाळीसगावकडे डॉ. उत्तमराव महाजन हे वाहनाने येत असताना भोरस शिवारात क्रॉसिंग जवळ दिनेश महाजन यांच्या कारमध्ये धडक झाली. यात दिनेश महाजन यांचा मुलगा देवांश दिनेश महाजन (४, चाळीसगाव) याचा जागीच मृत्यू झाला तर दिनेश देवराव महाजन, पत्नी स्वाती दिनेश महाजन, मुलगी अरोहित दिनेश महाजन तसेच दुसऱ्या वाहनातील डॉ. उत्तमराव महाजन जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे ताफ्यासह घटनास्थळी व नंतर रुग्णालयात दाखल झाले.