जळगाव : प्रतिनिधी
दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन योगेश बळीराम पाटील (५१, रा. चैतन्य नगर, जळगाव) हे ठार झाले. तसेच दुसऱ्या दुचाकीवरील मुस्तफा लतिफ खान (६५), बी. डी. फर्नाडिस (६१, दोघे रा. भुसावळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड न्यायालयामध्ये वरिष्ठ लिपिक असलेले योगेश पाटील हे दररोज जळगाव ते बोदवड ये-जा करतात. मंगळवारी (१ एप्रिल) रात्री ते दुचाकीने बोदवड येथून जळगावला येत असताना नशिराबाद ते तरसोद फाट्यादरम्यान हॉटेल सावन समोर समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये पाटील हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले, तर समोरील दुचाकीवरील मुस्तफा खान व बी. डी. फर्नाडिस हेदेखील खाली पडले. तिघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे योगेश पाटील यांचा मृत्यू झाला. जखमी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
योगेश पाटील हे दररोज अन्य सहकाऱ्यांसोबत कारने कामावर जायचे. मात्र मंगळवारी ते एकटेच दुचाकीने बोदवडला गेले होते. ड्युटी आटोपून ते एकटेच घराकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. योगेश पाटील यांच्या पत्नी लघु पाटबंधारे विभागात नोकरीला आहेत.