पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील वरखेडी बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी सतीश त्र्यंबक पाटील यांच्या मालकीचे गट नंबर १०२ मधील तीन एकर क्षेत्रात हरभरा लावलेला होता. परिपक्व झाल्यानंतर शेतात कापून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला सोमवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून संपूर्ण हरभऱ्याचे पीक जळून खाक झाले.
शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हरभऱ्याच्या गंजीवरून वीज वाहिन्या गेल्या असून सायंकाळी वादळ आल्याने या वीज वाहिन्यांचे घर्षण होऊन हरभऱ्याच्या गंजीवर ठिणगी पडली असावी व गंजीने पेट घेतला असावा.
वरखेडी-पाचोरा रस्त्यावर असलेल्या पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस पाटील यांची गटनंबर १०२ मध्ये शेतजमीन असून या शेतात त्यांनी उन्हाळी हरभऱ्याचे पीक घेतले होते. हे ३१ मार्च रोजी हरभरा पिकाची कापणी करून शेतातच एका ठिकाणी ढीग (गंजी) घालून ठेवला होता. ते मंगळवारी मळणी यंत्राच्या साहाय्याने हरभरा पिकाची काढणी करणार होते. त्या आधीच ही आग लागली. दुर्दैव असे की, रात्री ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरातील लोकांना शेतात आगीचा भडका दिसून आला. म्हणून त्यांनी लगेचच त्यांना याबाबतची माहिती दिली. सतीश पाटील यांनी मुलासह व मित्रांसह घटनास्थळी धाव घेतली. रात्री जीव धोक्यात घालून शेतात जाऊन हरभरा पिकाला पाणी भरणा करून घेतलेल्या अपार मेहनतीची डोळ्यांदेखत राखरांगोळी झाल्याचे पाहून प्रशांत पाटील यांनी तर टाहोच फोडला. लावलेल्या पिकावरील खर्च, तसेच कर्ज कसे फेडायचे? असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.