मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे अनेक अडचणीत असतांना आता पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केल्याने आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे सत्र सुरू ठेवले असून आज दि.१ त्यांनी पत्रकार परिषदेत मुंडे यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. मुंडेचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. याबाबत पीडित महिला शेतकरी २००८ पासून पोलीस ठाण्यात हलपाटे मारत आहेत. परंतु, त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. यापैकी काही महिला उपस्थित होत्या. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.
दमानिया पुढे म्हणाल्या की, राजेंद्र घनवट यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत निकटचे संबंध आहेत. व्यकटेश्वरा कंपनीमध्ये राजेंद्र पोपट घनवट आणि पोपट घनवट हे देखील आहेत. या लोकांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. १९९७ मध्ये मृत व्यक्तीला २००६ साली जिवंत दाखवून जामीन लाटली आहे. राजकारण्यांना हाताला धरून अशा जमिनी लाटल्या जात आहेत. त्यामुळे त्यांची तालुक्यात खूप दहशत आहे. जमिनी लाटून उलटून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोपट मारुती घनवट याची टोळी खूप मोठी आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. पुणे आणि खेड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी काही शासकीय प्रकल्प आणि इंडस्ट्रीजसाठी काढून घेतलेल्या आहेत. धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, राजेंद्र घनवट, आणि वाल्मिक कराड एकाच कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत. अशा प्रकारच्या दोन कंपनी आहेत, असे दमानिया यांनी सांगितले.