मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहविभाग आहे, त्यामुळे सर्वच विरोधक राज्यातील गुन्हेगारी फोफावत असतांना गृहमंत्री पदाचा राजीनामा मागत आहे. आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याचा कुणाला धाक राहिलेला नाही. सरकारी आशीर्वादाने वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, दारू, कोळसा माफिया तयार झाले आहेत. पोलिस आणि गृह विभाग काय करत आहे, फडणवीस यांनी आता तरी गृह खात्याचा मोह सोडून राज्याला पूर्ण वेळ गृह मंत्री द्यावा.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे आमदारच बीडचा बिहार, तालिबान झाल्याचे सांगत आहेत. बीडमध्ये आका, खोक्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच उदयास आले आहेत. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची मजल इतकी वाढली आहे की आता बीडच्या तुरुंगात टोळीयुद्ध सुरु झाले आहे. त्यामुळेच महादेव गित्तेसह काही आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलविल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बीडचे तुरुंगही सुरक्षित नसणे ही चिंतेची बाब आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, खून, दरोडे बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढूनही आरोपींना अटक होत नाही. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करावे लागते ही राज्याला शरम आणणारी बाब आहे. गुन्हेगार दररोज पोलिसांना आव्हान देत आहेत.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यात भाजप युतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतिशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते. त्यामुळे महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली. पण गेल्या काही दिवसांत सरकारच्या आणि विशेषत: गृहविभागाच्या गलथानपणामुळे महाराष्ट्राच्या नावाला काळिमा लागला असून महाराष्ट्राची तुलना उत्तरेतल्या राज्यातील जंगलराजसोबत होऊ लागली आहे.