भुसावळ : प्रतिनिधी
युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गौसीया नगर येथे घडली. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख रिजवान शेख रहीम (३४, व्यवसाय मजुरी, रा. बडी खानका मागे, मुस्लिम कॉलनी) हे आपल्या पत्नी व तीन मुलींसह शहरात राहतात. ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता ते घरातून बाहेर गेले होते. सकाळी ९.३० वाजता ते सहकाऱ्यांसह (शेख रेहमान, मोहम्मद नासीर, फैड़झल खान आणि शेख बिस्मिल्ला) गौसीयानगर येथे गेले. सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक रिजवान यांच्या पाठीवर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केला. हल्लेखोर दानीश ऊर्फ माया अकील शेख याच्या हातात चाकू होता आणि त्याच्यासोबत जकेरीया ऊर्फ बाबा जुनैद गौस व इतर तीन अनोळखी व्यक्ती होत्या. ‘तुने हमारे भाई को मार डाला, तुझे आज जिंदा नही छोडेंगे…’ असे म्हणत हातातील चाकूने पाठीवर वार केले. तिघांनी रिजवानचे दोन्ही हात धरून शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान, या घटनेने भुसावळातील हिंसक घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्याने दहशत निर्माण झाली आहे.
या हल्ल्यात रिजवान जखमी झाल्यानंतरही हल्लेखोरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड ऐकून त्यांचे सहकारी धावत आले आणि आरोर्पीना रोखण्याचा प्रयत्न केला. गर्दी जमल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या रिजवानला तातडीने रिक्षाद्वारे भुसावळ येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. सध्या त्यांच्यावर जळगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात जखमीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी दानीश ऊर्फ माया अकील शेख आणि जकेरिया ऊर्फ बाबा जुनैद गौस या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पो. नि. नीलेश गायकवाड तपास करत आहेत.