मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या पाच महिन्यापासून सतत चर्चेत असलेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांना बीड तुरुंगात मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा सर्व घटनाक्रम उलगडून सांगत आपसातील टोळी युद्धामुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे. वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला फक्त मारहाण झाली आहे. विशेषतः वाल्मीकला केवळ 2 कानशिलात लगावण्यात आल्यात. त्यामुळे त्याला रुग्णालयात वगैरे दाखल करण्याची काहीही गरज नाही, असे ते म्हणालेत.
सुरेश धस एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाली आहे. मला या प्रकरणाची माहिती आहे. महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी त्यांना मारहाण केली. महादेव गित्ते याला अटक होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्याने वाल्मीक कराडने आपल्याला खोट्या प्रकरणात गोवल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातून ही घटना घडली असेल. या प्रकरणी त्यांच्यात केवळ झटापट झाली. फक्त मारहाण झाली. त्यांना कोणत्याही वस्तूने मारहाण करण्यात आली नाही.
वाल्मीक कराड विरुद्ध बबन गित्ते या परळीतील टोळीयुद्धातून ही घटना घडली आहे. वाल्मीक कराड अगोदर म्हणायचे की, बबन गित्तेला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही. तर बबन गित्ते यांनी वाल्मीक कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही असा पण केला होता. बापू आंधळे हत्या प्रकरणात नावे चुकीच्या पद्धतीने गोवली गेल्यामुळे ही मारहाण झाली असावी.
सुरेश धस यांनी यावेळी बीड कारागृहातील कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बीड कारागृहातील सुरक्षा व बीड पोलिस यावर साडेचार 4 तासांचा चित्रपट निघेल, असे ते या प्रकरणी आपला संताप व्यक्त करताना म्हणाले. वाल्मीक कराडचे आत्ताही कारागृहातून बोलणे होत असल्याची माहिती आहे. कारागृह एवढे सुंदर असेल, तर तिथे हाणामाऱ्या नाही नाही तर काय होणार? मी या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या संपर्कात आहे, असे ते म्हणाले. सुरेश धस यांनी यावेळी वाल्मीक कराडला केवळ 2 कानशिलात लगावण्यात आल्याचा दावा करत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना नागपूर किंवा अमरावती तुरुंगात हलवण्याचीही मागणी केली. पुढे म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात वाल्मीक कराडला तुरुंगात दाखल करण्याची काहीच गरज नाही. कारण, त्याला फक्त दोन कानशिलात लगावण्यात आल्या आहेत. पण संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अमरावती किंवा नागपूरच्या तुरुंगात हलवले तर चांगले होईल. भविष्यात मारहाण होईल किंवा नाही या भानगडीत न पडता आज ही घटना घडली हे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणालेत.