नागपूर : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी (३० मार्च) हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. विशेष विमानाने त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन झाले.
पाच तासांच्या या भेटीत पंतप्रधान मोदी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर, दीक्षाभूमी येथे भेट, माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी व सोलार डिफेन्स, एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते हिंगणा मार्गावरील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार आहे. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. ‘अनमॅन्ड एरियल व्हेईकल्स’साठी १,२५० मीटर लांबीची धावपट्टी सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत.
पारंपरिक वेशभूषा धारण करून नागपुरात मोदींचे स्वागत करण्यात आले. नागरिकांनी गुलाब पुष्पांचा वर्षाव केला. तब्बल ११ वर्षानंतर संघ स्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आहे. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन झाल्यानंतर त्यांचा ताफा शहराच्या दिशेने वळला. शहरात ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पारंपारिक पोशाखात नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.