धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील हनुमंतखेडा या गावात चारित्र्याच्या संशयावरून तरूणाने आपल्या पत्नी व मुलावर कुऱ्हाडीने हल्ला करत तिला ठार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात घडली असून यात त्या व्यक्तीचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे भयंकर घटना घडली. येथील रहिवासी सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे हा आपली पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर नेहमी चारित्र्याबाबत संशय घेऊन मारहाण करत असे. काल पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास त्याने आपली पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. याप्रसंगी त्याने आपला दहा वर्षाचा मुलगा सिध्दू सोमनाथ सोनवणे याच्यावरही वार केले असून तो देखील गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मयत शीतल उर्फ आरती सोमनाथ सोनवणे हिचा भाऊ भाऊसाहेब भावलाल पवार (रा. हनुमंतखेडा. ता. धरणगाव ) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश वाघ, उपनिरिक्षक संतोष पवार व हवालदार राजू पाटील हे करत आहेत.