राज्यात रविवारी (दि. ३०) नवीन शके १९४७ या संवत्सराचे नाव विश्वावसु संवत्सर असे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढया उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते म्हणून संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करण्यास काहीच हरकत नाही. त्याकरिता असे कोणतेच बंधनही नाही. त्यामुळे गुढीपूजन, पंचांगपूजन अवश्य करावे, अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते यांनी दिली.
अशी उभी करा गुढी
गुढीपूजनाकरिता कोणताही विधी नाही. गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे याकरिता जे काही करता येण्यासारखे असेल तर सर्व करता येते. गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुऊन, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज, असेही म्हटले जाते. म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभिष्ट फलप्रद ।
प्राप्तेडस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ॥
ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे. त्यानंतर वर्षभरातील महत्त्वाच्या घटना पीक-पाणी यांची माहिती करून घ्यावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आणि नववर्षाचा आरंभदिन म्हणून गुढीपाडव्याचे महत्त्व आहे. पाडव्याचा मुहूर्त आणि गुढीपाडव्यापासून सुरू होणारे नवीन संवत्सर सुखाचे जावो, या सर्वांना शुभेच्छा!
विश्वावसु संवत्सराविषयी विशेष…
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एकूण तीन गुरुपुष्यामृत योग आहेत. यावर्षी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबर २०२५ आणि फाल्गुन पौर्णिमा म्हणजे तीन मार्च २०२६ रोजी अशी दोन चंद्रग्रहणे भारतात दिसणार आहेत. यावर्षी १३ जून २०२५, ६ जुलै २०२५ गुरूचा अस्त असून १४ डिसेंबर २०२५ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत शुक्राचा अस्त आहे. शनि संपूर्ण वर्ष मीन राशीत असणार असून कुंभ, मीन आणि मेष या राशींना साडेसाती आहे. या वर्षी श्रावण महिन्यात १२ ऑगस्ट २०२५ रोजी आणि पौष महिन्यात ६ जानेवारी २०२६ रोजी अंगारक चतुर्थीचा योग आहे. यावर्षी केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे ४ जून पर्यंत आगमन होईल असे दिसते. महाराष्ट्रात १६ जून पासून मान्सूनची सुरुवात होईल. विशेषतः जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस समाधानकारक होईल. मागच्यावर्षी पेक्षा पर्जन्यमान कमी असेल असे दिसते.