यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगावजवळ दुचाकी आणि एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ६२ वर्षीय अशोक यशवंत सपकाळे या वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला.
जखमी अशोक सपकाळे यांना तत्काळ किनगाव रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनगावजवळ जळगाव येथून एसटी बस (एमएच १४ बीटी २१४४) घेऊन चालक यावलकडे येत असताना किनगाव गावाच्या बाहेर कृषी विद्यालयाच्या समोर एसटी बस आणि मोटारसायकलची (एमएच १९ एटी ८५८८) धडक झाली. या अपघातात सपकाळे यांच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली. सचिन तडवी, बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, गुड्डू पिंजारी यांनी सपकाळे यांना किनगाव रुग्णालयात दाखल केले.
यशवंत सपकाळे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात भूषण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील हे पथकासह दाखल झाले होते. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे.