यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील साकळी येथील प्रकाश गणेशमल जैन (वय ६५) हे कुटुंबासह केरळ राज्यात फिरायला जात असताना रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना २३ मार्च रोजी मध्यरात्री घडली.
सविस्तर वृत्त असे कि, जैन व मित्राचे कुटुंब केरळ राज्यात फिरायला गेले होते. २१ मार्चला रात्री भुसावळ येथून मंगला एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान २३ मार्चला मध्यरात्री एक ते दीड वाजता प्रकाश जैन यांनी नातू पार्श याच्याशी गप्पागोष्टी करून मोबाईल त्याच्या जवळ दिला व लघुशंकेच्या निमित्ताने ते रेल्वे बोगीतील शौचालयाकडे गेले असता पुढील येणारे स्टेशन किती दूर आहे ? हे पाहण्यासाठी दाराजवळ गेले असता अचानकपणे तोल जाऊन ते रेल्वेतून खाली पडले. हे पाहून इतर प्रवाशांनी आरडाओरड केली. लागलीच त्यांचा मुलगा स्वप्निल जैन याने चेन ओढून रेल्वे थांबविली.
जवळपास दोन किलोमीटर मागच्या दिशेने पळत जाऊन घटनास्थळी गेले असता प्रकाश जैन हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांच्या पोटाला रुळावरील लोखंडी पाईप लागून खोलवर जखम झाली होती. त्यामुळे खूप मोठा रक्तस्रावही झालेला होता. तसेच नाकातून रक्तस्राव झाला होता. ही दुर्दैवी घटना बैकुल पोलिस ठाण्याच्या हद्दीत कासरगोड- निलेश्वरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. गंभीर जखमी अवस्थेतील जैन यांना स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मदतीने कासरगोड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृत जैन यांच्यावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते जळगाव येथील लाईफ केअर फार्मास्युटिकल, तसेच पार्श फार्मास्युटिकलचे संचालक स्वप्निल जैन, तसेच फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा. स्वीटी रितेश जैन यांचे वडील, तर साकळी येथील डॉ. पी. सी. जैन यांचे जावई होत.