भुसावळ : प्रतिनिधी
गोरखपूर-बंगळुरू एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा तिकीट निरीक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार २२ मार्च रोजी घडला. पोलिसांनी संशयित रेल्वे तिकीट निरीक्षक प्रदीपकुमार तिवारी यास ताब्यात घेतल्यानंतर नोटीस बजावत त्याची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील १९ वर्षीय तरुणी २२ रोजी गोरखपूर-बंगळुरू विशेष ट्रेनने पुण्याकडे निघाली होती. तिचे सेकंड एसीचे तिकीट आरएसी असल्याने तिने तिकीट निरीक्षकाची भेट घेत त्यांना बर्थ देण्याची मागणी केली. गाडीतील तिकीट निरीक्षक तिवारी याने फर्स्ट एसीमध्ये सीट दिले. तरुणी सीटकडे गेल्यानंतर तिकीट निरीक्षकाने तिचा विनयभंग केला. तसेच तरुणी वॉश रूममध्ये गेल्यानंतरही संशयित बाहेर थांबून राहिला. भुसावळ स्थानक येईपर्यंत हा प्रकार घडल्याने पीडितेने वडिलांना प्रकार सांगितला. यानंतर मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हा गुन्हा भुसावळ हद्दीत घडल्याने तो भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी तिवारी यास ताब्यात घेतले.