धरणगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयात लाच मागण्याच्या अनेक घटना घडत असतांना आता नुकतेच धरणगाव पंचायत समितीतील येथील एका अधिकाऱ्याने वर्क ऑर्डर काढण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना सहाय्यक कार्यक्रम अधिकार्याला जळगाव एसीबीने कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. हा सापळा शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला. प्रवीण चौधरी असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला वर्क ऑर्डर देण्यासाठी प्रवीण चौधरी यांनी दिड हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता कार्यालयात प्रवीण चौधरीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.