सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापुरातील पोलिस ठाण्यातच नाइंट्या नावाच्या दारुड्याने पोलिस निरीक्षकाच्या छातीवर बुक्की मारून थुंकल्याची घटना घडली. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने नाइंट्या ऊर्फ ओंकार संतोष नलावडे (रा. सुंदराबाई डागा प्रशालेच्या जवळ, सोलापूर) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास प्रजा मटण स्टॉलच्या बाजूला, रामलाल चौक (सोलापूर) येथे घडली. याप्रकरणी पोलिस अंमलदार दिनेश घंटे यांनी फिर्याद दिली आहे. नाइंट्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी व जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षांपूर्वी तडीपार केले होते. १९ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास रामलाल चौक येथे आरोपी व इतर तीन व्यक्तींमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी आरोपी ओंकार नलावडे हा तेथील फुटपाथवर स्वत:चे डोके व तोंड आपटत होता.
त्यामुळे त्याच्या तोंडातून रक्त येत होते. पोलिसांना हा प्रकार समजताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार दिनेश घंटे त्याठिकाणी गेले. त्याला पोलिस ठाण्यात आणताना रिक्षामध्ये आरोपीने फिर्यादीच्या अंगावर थुंकून शिवीगाळ केली. शर्टला धरून ओढाओढी केली. पोलिस ठाण्यात आणल्यांनंतर तो परत पोलिसांच्या अंगावर थुंकला. आरोपी आरडाओरड करीत असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगितले. त्यावर त्याने पोलिस निरीक्षक माने यांच्या छातीवर बुक्की मारली. उजव्या हातास त्यांना जबर मुक्का मार लागला.