जळगाव : प्रतिनिधी
शहरात नवीन रुग्णालयाचे काम सुरू करायचे असून, त्यात तुम्हाला पार्टनर बनवितो, असे आमिष दाखवीत जळगाव शहरातील एकाने हॉटेल व्यावसायिकाची तब्बल २० लाख ७३ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शोएब अब्दुल (वय ३०, रा. सदगुरू अपार्टमेंट, शाहूनगर) हे जळगाव शहरात हॉटेलचा व्यवसाय करतात. १५ जून ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान मोहसीन गुलाब पिंजारी (रा. संगम बेकरीजवळ) यांनी मोहम्मद शोएब अब्दुल यांना जळगाव शहरात एक रुग्णालय सुरु करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी काही रक्कम लागणार असल्याचे पिंजारी याने मोहम्मद अब्दुल यांना सांगितले. त्यासाठी मोहसीन पिंजारी याने मोहम्मद शोएब अब्दुल यांच्याकडून सुरुवातीला १४ लाख ७३ हजार रुपये हातउसनवारीवर घेतले. त्यानंतर पुन्हा साक्षीदार वसीम अख्तर जमील अख्तर याच्याकडूनही सहा लाख रुपये घेतले, अशी २० लाख ७३ हजार रुपयांची रक्कम घेऊन, रुग्णालयात पार्टनरही केले नाही.
दुसरीकडे घेतलेली रक्कमदेखील परत केली नाही. मोहम्मद शोएब अब्दुल यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन, तक्रार दिली. मोहसीन गुलाब पिंजारी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.