रावेर : प्रतिनिधी
शहरातील एका व्यापाऱ्याकडून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारीत करण्याची धमकी देऊन १ लाखाची खंडणी घेताना रावेर पोलिसांनी रंगेहाथ पकडलेल्या महिलेच्या मायाजालात रिक्षावाला, बॅटरीवाला, डॉक्टर, पीडीत व्यापाऱ्याचा आप्तेष्ट व जिल्ह्यातील काही वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस व वनरक्षकांसह तब्बल ५० ते ६० जण अजून बळी पडले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यातील दुसरा आरोपी तथा या महिलेचा मुलगा निर्मल चुन्नीलाल पाटील (वय २१, रा लोणी, ता. चोपडा) यास रावेर पोलिसांनी अटक करून या महिलेसह रावेर न्यायालयात हजर केले असता दोघांना सोमवारपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात विवाहबद्ध झाल्यानंतर सुखी संसारवेलीवर एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य फुलली असताना या महिलेचे पतीशी खटके उडाल्याने तिची फारकत होऊन ती चोपडा तालुक्यातील लोणी येथील माहेरात वास्तव्यास आहे.
संसाराचा रहाटगाडा बिघडल्याने मायाजालात अडकवलेल्या लोकांचे आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याचा तिचा हातखंडा सुरू असताना गत सात वर्षांपासून रावेर शहरातील हा धनाढ्य व्यापारी गळाशी लागला. वारंवार पैसे मागण्याच्या तिच्या या त्रासाला कंटाळून त्याने रावेर पोलिसांना आपबिती सांगताच त्यांनी आरोपीकडून पैशांची मागणी झाल्यास तिला घटनास्थळी बोलावून खबर देण्याचा सापळा रचला होता. त्या अनुषंगाने बुधवारी ही महिला १ लाखाची खंडणी घेण्यासाठी आली असता रावेर पोलिसांनी छापा टाकून तिला १ लाखाची खंडणी घेताना रंगेहाथ पकडल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.
या महिलेला गजाआड केल्यानंतर प्रथमदर्शनी तपासात रावेर शहरासह परिसर व तालुक्यातील तथा जिल्ह्यातील जवळपास ५० ते ६० जण तिच्या मायाजालात बळी पडल्याचे निष्पन्न झाले. संबंधितांनी रावेर पोलिसांत स्वतः हून पुढे येऊन तक्रार द्यावी अन्यथा सबळ पुराव्यांसह त्यांची सखोल चौकशीही करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल व सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.