पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात घट येण्याची शक्यता आहे.
राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मार्च महिन्यातील पहिल्या टप्प्यापासून उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हाच कमाल तापमानाचा पारा 41 अंशांपर्यंत पोहोचला आहे. बुधवारीदेखील राज्यात कमाल तापमानाचा पारा सर्वात अधिक ब—ह्मपुरीत 41.5 अंशसेल्सिअस एवढा नोंदला गेला. मात्र, अवकाळी पावसामुळे पुढील काही दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या ओडिसा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मध्य ते मध्यपूर्व भागापर्यंत विस्कळीत वर्यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्यात कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस वादळी वारे, विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जनेसह हजेरी लावणार आहे.
याबरोबरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा प्रभाव मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड तसेच ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, आंध—प्रदेशासह इतर राज्यापर्यंत आहे. त्यामुळे याही भागात अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ होणार आहे. याच्याही प्रभावामुळे राज्यासह भारतातील इतर भागात अवकाळी पाऊस पुढील तीन दिवस हजेरी लावणार आहे.
यलो अलर्ट – भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, सातारा, कोल्हापूर, सांगली.