बीड : वृत्तसंस्था
राज्यभर चर्चेत असलेले ‘खोक्या’ प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी शिरूर न्यायालयाने सुनावली आहे. त्यामुळे खोक्याचा पुढील 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी भोसले अटकेत आहे. सात दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज खोक्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले होते.
एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ढाकणे पिता-पुत्राला मारहाण, घरात आढळलेला गांजा या प्रकरणात देखील गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता. अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर यासह इतर ठिकाणी त्याने प्रवास केला. संभाजीनगरहून तो थेट प्रयागराज येथे पोहोचला होता. त्याचे लोकेशन मिळताच बीड पोलिसांनी प्रयागराज पोलिसांशी संपर्क साधत त्याला त्याच ठिकाणी अटक केली. यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन त्याला बीडकडे आणण्यात आले. शिरूर येथील न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ती आज पूर्ण झाल्याने खोक्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते.