जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात रस्त्यावरील पाणी वाहत असल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करत, लोखंडी पेंचीस डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी सकाळी १०:३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी दुपारी दोन वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबूलाल खान गुलाब खान (वय ४५, रा. शिवाजीनगर हुडको) यांच्याबाबतीत ही घटना घडली आहे.
सोमवारी सकाळी १०:३० वाजता खान यांच्या घरासमोरून पाणी वाहत असल्याच्या कारणावरून त्यांच्या गल्लीत राहणारे जाकीर, बाबू, रुकय्या, त्यांची दोन्ही मुले आणि त्यांची बहीण या सर्वांनी बाबूलाल खान यांना शिवीगाळ करत मारहाण केली. जाकीर याने हातात लोखंडी पेंचीस पकडून बबलू खान यांच्या डोक्यात टाकून त्यांना गंभीर दुखापत केली. याप्रकरणी बाबूलाल खान यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ओमप्रकाश सोनी हे करीत आहेत.