यावल प्रतिनिधी । शहरातील सरस्वती विद्या मंदिर शेजारील मदन बळवंतराव भोईटे यांचे घरात शुक्रवारी २५ मार्च रोजी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागलेल्या घरांचे वयोवृद्ध कुटुंबीय रात्री उशीरापर्यंत बुलढाणाहुन परतल्यावर पंचनामान्याच्या कामास सुरूवात झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल शहरातील सरस्वती विद्या मंदीर शेजरील राहणारे मदन भोइटे यांचे घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मदन भोईटे कुटुंबीय शुक्रवारी २५ मार्च रोजी सकाळी ६ वाजता नातेवाईकांकडे बुलडाणा येथे गेले होते. दुपारच्या वेळी सर्वत्र सामसूम असल्याने व बंद घरात आग लागल्यामुळे त्याची कल्पना बाहेर लवकर आली नाही. घरात सागवानी लाकडांचा धाबा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्यावर शेजारच्यांना आग लागल्याची कल्पना आली. तोपर्यंत आगीने पूर्ण घर काबीज केले होते. परिसरातील व आगीची घटना पाहणारे नागरिक आग विझविण्यासाठी मिळेल ते साधन हातात घेऊन आग विझविण्यासाठी सरसावले. घटनास्थळी माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, व्यास प्रासादिक एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष रमाकांत देशपांडे, माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, भाजपचे शहर अध्यक्ष निलेश गडे, दिलीप वाणी, गणेश महाजन,पालिकेचे अधिकारी, तलाठी ईश्वर कोळी आदींनी भेट दिली.
सरस्वती विद्यामंदिर जवळ आग लागल्याची बातमी कळताच एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात बसलेले पालिकेचे पाणी पुरवठा व्हॉलमन अर्जुन लावणे यांनी तत्काळ सरस्वती विद्यामंदिर भागात नळांना पाणी सोडले. त्यामुळे पालिकेचा औषध फवारणी करणारा सर्वात लहान टॅंकरमध्ये आग विझवणारे नागरिक बादल्या भरून आणून टाकत होते. यावेळी अग्निशमब बंब वेळेत हजर न झाल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला होता. हिंदू मुस्लिम बांधवांनी आग विझविण्यासाठी मदत करत माणूसकीचा संदेश दिला.