नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संपूर्ण जगाने महाकुंभ मेळ्याच्या रूपात भारताची भव्यता पाहिली. महाकुंभात आपण राष्ट्रीय जागृतीचे साक्षीदार आहोत, जे नवीन कामगिरीला प्रेरणा देईल. यामुळे आपल्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्यांनाही योग्य उत्तर मिळाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मंगळवारी लोकसभेत पंतप्रधान मोदींनी महाकुंभाच्या आयोजनावर भाष्य केले. यावेळी त्यांनी या कार्यक्रमात योगदान देणाऱ्यांचे आभार मानले.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी अयोध्येत झालेल्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याने आपल्या सर्वांना पुढील एक हजार वर्षांसाठी देश कसा तयारी करत आहे, याची जाणीव करून दिली. या वर्षी महाकुंभाने आपल्या विचारांना आणखी बळकटी दिली आहे. देशाची ही सामूहिक जाणीव आपल्याला देशाच्या ताकदीबद्दल सांगते. मानवी जीवनाच्या इतिहासात असे अनेक वळण येतात, जे भावी पिढ्यांसाठी उदाहरण बनतात. आपल्या देशाच्या इतिहासातही असे काही क्षण आले आहेत, ज्यांनी देशाला जाणीव करून दिली.
महाकुंभावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाकुंभात लोकांनी सोयी किंवा गैरसोयीची चिंता न करता सहभाग घेतला. आपल्या परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आहेत. आज भारतातील तरुणाई अभिमानाने आपली परंपरा, श्रद्धा आणि चालीरीती स्वीकारत आहे. एक देश म्हणून आम्हाला मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचा आत्मविश्वास मिळाला. आपल्या वारशाशी जोडण्याची परंपरा ही आजच्या भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे. महाकुंभात राष्ट्रीय चेतना दिसून आली. देशाच्या सामूहिक जाणीवेचे परिणाम महाकुंभमेळ्यादरम्यान दिसून आले. महाकुंभावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांची उत्तरे मिळाली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात आध्यात्मिक चेतना उदयास आली आहे, असे मोदी म्हणाले.