नागपूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले असताना नागपूर शहरातील महाल परिसरात आज सोमवारी (दि. 17) रात्री 8 च्या सुमारास मोठा राडा झाला. त्यात दोन विशिष्ट समुदायाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत त्यांच्या गाड्या पेटवून दिल्यात. यामुळे नागपुरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जादा कुमक मागवली आहे. या घटनेत डीसीपी आणि पोलीस कर्मचाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूरमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आंदोलन झाले. औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन याठिकाणी चर्चा झाली तसेच घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर वातावरण शांत झाले होते. अशातच सायंकाळी काही समाजविघटक जमावाने एकत्र येऊन त्यांनी दगडफेक तसेच जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. काही वाहनांना आगही लावणयात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. काही लोकांनी पोलिसांच्या दिशेनेही दगड भिरकावल्याने याठिकाणी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मात्र पोलीस जमावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले जात आहे.
दरम्यान, नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.