चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वाघडू येथे अचानक रस्त्यावर आडवा आलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात कार पुलावरून खाली कोसळली. शनिवारी दुपारी घडलेल्या या अपघातात कारमधील पती-पत्नीसह त्यांचा दोन वर्षाचा बालक किरकोळ जखमी झाला. लखीचंद राठोड (३३), राणी राठोड (२६) व मुलगा दुर्गेश राठोड (२) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लखीचंद राठोड हे कुटुंबासह गाडीने (एमएच१२/एक्सक्यू५९९८) मांडवा (ता. जामनेर) येथून धूलिवंदन साजरे करण्यासाठी सासरवाडी (वाघला कोंगानगर, ता. चाळीसगाव) येथे येत होते. नागद गावापासून काही अंतरावर असताना एक दुचाकीस्वार आडवा आला. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटून कार पुलावरून खाली कोसळली. कारचा आवाज आल्याने येथील मनीषा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना पुलाखाली कार कोसळलेली अवस्थेत दिसली.
त्यांनी ग्रामस्थांना बोलवत या अपघातग्रस्त कारमधून जखमी राठोड कुटुंबास बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातातील जखमी लखीचंद राठोड हे पुणे येथे अभियंता आहेत. धूलिवंदन साजरी करण्यासाठी ते आपल्या गावी मांडवा येथे आले होते. ते सासरवाडी वाघले कोंगानगर येथे येत होते. यादरम्यान हा अपघात झाला.. अपघाताच्या वेळी एअर बॅग उघडल्याने मोठा धोका टाळला.