जळगाव : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलाच्या अपहरणाच्या संशयावरुन तलवार घेत पाठलाग करीत तरुणाने एका प्रार्थनास्थळाबाहेरील माठ व इतर साहित्याची नासधूस केली. ही घटना रविवारी (१६ मार्च) वाल्मिक नगरात घडली. याप्रकरणी प्रवीण रमेश कोळी (३०, रा. वाल्मीक नगर, पिंजारी वाडा) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासह अपहरण करणाऱ्या अज्ञाताविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वाल्मिक नगर परिसरात अल्पवयीन मुलगा घराबाहेर खेळत असताना काही जणांनी त्याचे अपहरण केल्याचा संशय परिसरातील नागरिकांना आला. त्या वेळी प्रवीण कोळी हा तलवार घेवून त्या इसमांच्या मागे गेला. अपहरण करणारे एका प्रार्थनास्थळाच्या दिशेने गेल्याचे समजल्याने हा तरुण त्या परिसरात पोहचला व बाहेर ठेवलेले माठ व इतर साहित्याची नासधूस केली. अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर तलवार घेवून तोडफोड करीत दहशत पसरविल्याप्रकरणी प्रवीण कोळी याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोहेकॉ गिरीश पाटील, गजानन पाटील, अनिल कांबळे घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्रवीण कोळी याला ताब्यात घेतले. संशयित तरुणाला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर दोन्ही गटातील नागरिकांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. तेथे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित पोहलचे. त्यांनी कारवाईची ग्वाही दिली.