यावल : प्रतिनिधी
अकलूद या गावात एका ६५ वर्षीय इसमाने दोन जणांकडून उसनवार पैसे घेतले होते. याचे व्याज मागितले जात होते. या त्रासाला कंटाळून वृद्धाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, प्रभाकर कडू पाटील (६५) या वृद्धाला विनोद श्रीराम इंगळे व गणेश भागवत काळे (रा. अकलूद, ता. यावल) या दोघांनी उसनवार पैसे दिले होते. विनोद श्रीराम इंगळे व गणेश भागवत काळे हे दिलेल्या पैशाचे व्याज प्रभाकर पाटील यांच्याकडून घेत होते आणि सातत्याने त्यांच्याकडे व्याजाचे पैसे मागण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून दि. १२ मार्च रोजी प्रभाकर पाटील यांनी तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात हिरामण पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन जणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुढील तपास फैजपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहेत.