बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरण ताजे असताना आता आष्टी तालुक्यात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी घुमरी येथे विकास बनसोडे नावाच्या तरुणाचा मालकाने खून केल्याचा आरोप विकासाचे नातेवाईक करत आहे. आरोपी बाबासाहेब क्षिरसागर यांच्याकडे विकास कामाला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्याला बांधून मारहाण केली जात होती. त्याच्या घराच्यांना फोन करुन ‘तुमच्या मुलाला घेऊन जा नाहीतर आम्ही मारून टाकू’, अशी धमकी दिली होती. धमकी मिळताच घराच्यांनी तात्काळ कडा आरोग्य केंद्र रुग्णालय गाठले. परंतु तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे.
मूळचा जालन्याचा 25 वर्षीय विकास बनसोडे बीडमधील आष्टी तालुक्यातील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे गेल्या चार वर्षांपासून तो ट्रक चालकाचं काम करीत होता. त्याचे भाऊसाहेब क्षीरसागर याच्या मुलीशी प्रेमप्रकरण सुरू होते. त्या दिवशी घराच्या मागील बाजूच्या शेतात विकास आणि आपल्या मुलीला पाहून भाऊसाहेब क्षीरसागर संतापले. त्यांनी दोन दिवस विकासला डांबून ठेवले आणि जबर मारहाण केली. त्याच्या शरीरभर व्रण दिसत आहेत. यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या प्रकरणानंतर आरोपीने मृत विकासच्या कुटुंबियांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यातील संभाषणाची ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर विकासच्या कुटुंबीयांना दमदाटी करताना दिसून येत आहे. तसेच तुम्ही अर्जंट माझ्या घरी या असे त्याने विकासच्या कुटुंबियांना सांगितले आहे. ”तुम्ही नवरा-बायको लवकरात लवकर या. तुमच्या जे कुणी असेल त्याला घेऊन या. इकडे आल्यावर तुम्हाला पराक्रम सांगतो. तुमचा लेक माझ्याकडे आहे. तुम्ही लवकर आमच्या घरी या.’ असे आरोपीने यावेळी म्हटले आहे.
यावर विकासची आईने, ”आता आम्हाला ऐवढं अर्जंट वाहन कसे मिळेल आम्ही कसं येणार’, असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर ”तुम्ही संध्याकाळपर्यंत इथे आले पाहिजे आणि येता येत नसेल तर तसे सांगा. तुम्ही आताच्या आता गाडीत बसले पाहिजे”, असे त्याने विकासच्या कुटुंबीयांना म्हटले आहे. याशिवाय विकासच्या आईने त्याला मारहाण करू नका, अशी विनंतीही आरोपीला केली आहे, ‘तुम्ही त्याला जी काही मारहाण केली असेल. पण आता त्याला मारू नका. आम्ही येईपर्यंत त्याला हात नका लाऊ. आम्ही येतो पण तुम्ही त्याला काही करू नका, असं विकासच्या आई म्हणाल्या.