मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प जाहीर केला होता, आता सरकारविरोधात विरोधकांनी रान उठविले आहे तर आता महाराष्ट्र सरकार हे ढोंगी आणि दुतोंडी असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या आणि पाण्याच्या प्रश्नावर आतापर्यंत सरकारने तोंड उघडले नाही. हे सरकार बाकी सर्व प्रश्नांवर बोलतोय. राजकीय प्रश्नांवर बोलतात, व्यक्तिगत प्रश्नांवर बोलतात, विरोधकांवर बोलतात, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर हे सरकार बोलायला तयार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बुलडाण्यातल्या ज्या तरुण शेतकऱ्याने आणि कृषी क्षेत्राचा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या केली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्या शेतकऱ्याने अनेकदा मुख्यमंत्री आणि कृषि मंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर वैफल्यग्रस्त होत त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ही केवळ शेतकरी कैलास नागरे यांची आत्महत्या नाही तर सरकारने केलेली शेकडो शेतकऱ्यांचे हत्या असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्याच्या आत्महत्येचे पातक हे राज्य सरकारवर आहे. त्यामुळे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा? त्याचा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
आपल्या राज्यातील शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करत आहेत. ते देखील असामान्य शेतकरी नाहीत तर ज्यांनी शेतीमध्ये अनेक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. जलसिंचनाचे प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी आहेत. मात्र सरकार काहीच करत नाही, त्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. याची सरकारला लाज वाटत नाही का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
राज्यातील हे सरकार खोक्या, बोक्या आणि ठोक्याच्या मागे लागले हे बरोबर आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार? शेतकऱ्यांना दिलेली वचने कधी पूर्ण करणार? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आपला जाहीरनामा पुन्हा एकदा वाचावा, असे आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले आहे.