सोलापूर : वृत्तसंस्था
मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या मंदिरावरून खालील बाजूला उभ्या असलेल्या अन् खाली उभे असलेले भाविक मंदिरावर असलेल्या भाविकावर दगड मारून धुळवड साजरी केली. दगडफेकीची चालत आलेली परंपरा मागील सुमारे ३०५ वर्षांपासून आजही तितक्याच मोठ्या उत्साहात साजरी करीत ग्रामस्थांकडून जोपासली. भोयरेचे ग्रामदैवत श्री जगदंबा देवी असून, हे मंदिर उंच टेकडीवर शेकडो वर्षांपूर्वी दगडात बांधण्यात आलेले आहे.
मंदिरास ४० पायऱ्या आहेत. तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी, बिटले येथील देवी व भोयरे येथील जगदंबा देवी या सख्ख्या तीन बहिणी असल्याची आख्यायिका आहे. या देवीची यात्रा पौष महिन्यात भरते. शुक्रवारी धुळवडीदिवशी या ठिकाणी देवीच्या मंदिरावरून गावातील मुख्य चौक असलेल्या साखरबाई चौकात उभ्या असलेल्या भाविकांना तर चौकातील भाविक मंदिरावर उभ्या असलेल्या भाविकांना दगड मारून धुळवड साजरी केली. हा दगड मारण्याचा प्रकार सुमारे अर्धा ते पाऊण तास चालला.
मंदिरातून आई राजा उदे उदे… च्या गजरात वेशीत असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते. गावाजवळनूच गेलेल्या भोगावती नदीच्या पात्रात जाऊन हालगी, झांजच्या कडकडाटात कुस्त्यांचा फड रंगतो, कुस्त्या संपल्यानंतर देवीचा छबिना गावाची वेस असलेल्या हनुमान मंदिरापाठीमागे आल्यावर भाविकांत दोन गट निर्माण होऊन एकमेकांवर तुफान दगडफेक केली जाते. काही वेळानंतर सर्वच भक्त मंदिराकडे येतात. त्यामधील काही भाविक मंदिरावर असलेल्या भक्तनिवासाच्या वर दगड घेऊन उभे असतात. तर काही मुख्य चौकात खालील बाजूस उभे राहतात. देवीचे पुजारी छबिना घेऊन मंदिरात जाताच क्षणी तुफान दगडफेक चालू होतो.