पुणे : वृत्तसंस्था
राज्यभरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा उत्साहात साजरा होत असतांना पिंपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंद्रायणी नदीत पोहून धुलवड साजरी करणे तीन तरुणांच्या जीवावर बेतले आहे. धुलवडीनिमित्त इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी साडेचारच्या सुमारास किन्हई गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या पात्रात घडली.
गौतम कांबळे (वय २४), राजदीप आचमे (वय २५) आणि आकाश विठ्ठल गोरडे (वय २४, सर्व रा. घरकुल, चिखली) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुलवड सण साजरा करण्यासाठी घरकुल येथील चार ते पाच तरुण कन्हई गाव येथे गेले होते. सर्व तरुण पोहण्यासाठी इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने यातील तीन तरुण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रहिवासी, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. काही वेळ शोध घेतल्यानंतर पाण्यात तीनही तरुणांचा मृतदेह सापडला.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविले आहेत. दरम्यान, घरकुल येथे राहणारे तरुण एकमेकांचे मित्र होते. ते धुलवड साजरी करण्यासाठी किन्हई गावात गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.