पाचोरा प्रतिनिधी । सबसीडी बँकेत अदा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच स्विकारणाऱ्या कृषि सहाय्यक अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने पकडले आहे. कारवाईमुळे पाचोरा कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील भोजे येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण (महाडीबीटी) योजनेंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पॉवर ट्रिलर आठ एचपीचे मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. हा अर्ज हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजुर झाल्याने बीसीएस पॉवर ट्रिलर खरेदी करण्यात आले व या योजनेंतर्गत मिळणारी ८५ हजारांची सबसीडीची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार विठ्ठल देवरे (वय-३२) रा. आनंद नगर, प्रतिभा फ्लोअर मिल जवळ, पाचोरा याने दीड रुपयाची मागणी केली होती. याबाबत तक्रार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी २४ मार्च रोजी पथकाने सापळा रचून दीड हजार रुपयाची लाचेची रक्कम स्विकारतांना अधिकाऱ्याला पकडले. या कारवाईमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.