दादर : वृत्तसंस्था
राज्यात आज होळीचा सण असल्याने सगळीकडे धामधूम सुरु आहे. यादरम्यान मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडले. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर बाकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही अपघाताची घटना प्रभादेवी ब्रिजवर मध्यरात्री 2.30 वाजता घडली. प्रणय बोडके (29), करण शिंदे (29) आणि दुर्वेश गोरडे हे तिघेजण स्कुटरवरून परेलवरून दादरला होळीसाठी फुले आणण्यास चालले होते. यादरम्यान शिवनेरी बस चालक ब्रिजवरून समोरच्या दिशेने भरधाव वेगाने आला. यानंतर त्याने समोरून येणाऱ्या स्कुटरला जोरदार धडक दिली.
या अपघातात स्कुटरवरील तिघेही गंभीर जखमी झाले. या तिघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रणय बोडके याचा केईएम रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दुर्वेश आणि करण गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इकबाल शेख असे चालकाचे नावं असून तो MSRTC ची निळ्या रंगाची बस MH12VF3305 चालवत होता. अपघातानंतर आरोपी इकबाल हा पळून जाण्याच्या तयारीत असताना उपस्थित लोकांनी त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.