अमळनेर : प्रतिनिधी
शेतातील मका का तोडला याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तिघांनी एकाला जबर मारहाण करून त्याच्या पत्नीलाही मारहाण व मुलीचा विनयभंग केल्याची घटना ९ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील एक शेतकरी ८ रोजी सायंकाळी आपल्या शेतात काम करीत असताना गोपीचंद नारायण पाटील, सचिन गोपीचंद पाटील, चंद्रकांत गोपीचंद पाटील हे तिघे आले व त्यांनी शेतातील मका पिकाची मोडतोड करून नुकसान केले.
९ रोजी सायंकाळी पुन्हा तिघांनी तोच प्रकार केल्याने शेतमालक त्यांना बोलायला गेले असता त्यांनी शिवीगाळ मारहाण केली. चंद्रकांत पाटील याने वर उचलून फेकून दिले. त्यामुळे शेतमालकाच्या छातीवर पोटावर मुका मार लागला. शेतमालक बैलगाडीने घरी पोहोचत नाही तोच तिघे त्याच्या घरी पोहोचून त्याच्या पत्नीला व मुलीला शिवीगाळ व मारहाण करत होते. शेतमालकाने दवाखान्यात उपचार घेऊन नंतर पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यावरून गोपीचंद, सचिन, चंद्रकांत अशा तिघांविरुद्ध मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत.