जळगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव शहरात १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या विवाहसमारंभातून १२ लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या सहाय्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून, चोरटे मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी नऊ दिवस मध्य प्रदेशात थांबून चाळीसगावच्या चोरीसह जिल्ह्यातील इतर तीन चोऱ्यांमधील तब्बल १६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या कारवाईत चोरटे पोलिसांच्या हाती लागले नसले तरी मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली.
चाळीसगाव येथील विवाहस्थळावरून तांत्रिक पुरावे मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुलखेडी, ता. नरसिंहगढ, जि.राजगढ, मध्य प्रदेश येथील आरोपींनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक या ठिकाणी जाऊन तब्बल नऊ दिवस संबंधितांच्या मागावर होते. एका संशयितांच्या घराची तपासणी केली असता, त्या ठिकाणाहून चाळीसगाव येथील चोरीतील १२ लाखांचा मुद्देमाल आढळून आला. यासह अमळनेर, मुक्ताईनगर व भडगाव येथील चोऱ्यांप्रकरणी दाखल गुन्ह्यातीलही इतर ४ लाखांचा असा एकूण १६ लाखांचा माल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी आरोपींना अटक होऊ शकलेली नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.