जळगाव : प्रतिनिधी
मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रावेरहून जळगावला आलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीचा परत रावेरला जात असताना, जळगाव रेल्वेस्थानकात तोल जाऊन रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर शहरात अनिल जाधव हे पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होते. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पत्नी जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील माहेरी आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथे आले होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी रात्री ९ वाजता जळगाव रेल्वेस्थानकावर रावेर येथे जाण्यासाठी आले होते. त्यावेळी रात्री ९ वाजता कामायनी एक्स्प्रेसमध्ये चढत असताना त्यांचा तोल गेल्याने ते रेल्वेखाली आले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.