फैजपूर : प्रतिनिधी
येथील तहानगरमध्ये राहणाऱ्या महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी अज्ञात चोरट्यांनी हातसफाई करत लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. १०) मध्यरात्री घडली. अज्ञात चोरट्यांनी ९३ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व ८ हजार रुपये रोख असा एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
सविस्तर वृत्त असे कि, सातारा जिल्ह्यातील कराड येथे महसूल विभागात नोकरी करीत असताना सेवानिवृत्त झालेले बबन सुभान तडवी हे कराड येथेच सध्या वास्तव्याला आहे व त्यांनी फैजपूर येथेही तहानगर भागात नवीन घर बांधलेले आहे. मुलाच्या लग्नानिमित्त ते एक महिन्यासाठी येथे आले होते. लग्नकार्य आटोपून ते परत कराड येथे गेले असता त्यांनी घराची जबाबदारी त्यांचे लहान भाऊ राजू सुभान तडवी यांच्यावर सोपवलेली होती, यानुसार राजू तडवी हे या घरात झोपत होते. दि १० रोजी राजू तडवी हे बाहेरगावी गेल्याने या नवीन घरात कोणीही नव्हते. ही संधी साधत सोमवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून कपाटातील १५ हजार तसेच ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ८ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी राजू तडवी यांना मिळतात त्यांनी घराकडे धाव घेतली व चोरीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी श्वान पथकासही पाचरण करण्यात आले होते. मात्र, फारसा माग मिळाला नाही.