यावल : प्रतिनिधी
पिंप्री येथे प्रेमविवाह केला, त्या रागातून १८ वर्षीय तरुणीवर तिच्या मामाने प्राणघातक हल्ला केला. ही घटना दि. ८ मार्च रोजी सकाळी आठ वाजता घडली होती. तर याप्रकरणी चार दिवसांनंतर अखेर यावल पोलिस ठाण्यात तरुणीच्या फिर्यादीवरून मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वैष्णवी विनोद तायडे (१८, रा. उल्हासनगर) हिने प्रेमविवाह केला या रागातून तिचे मामा उमाकांत चिंधू कोळी (रा. पाडळसे, ता. यावल) याने दि. ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजेला पिंप्री येथे जाऊन वैष्णवी तायडेवर हल्ला केला होता.
त्यात वैष्णवीला वाचवण्याकरिता तिची नणंद वैशाली स्वप्नील सपकाळे ही समोर आली होती. तिलादेखील दोन्ही हातावर आणि डोक्यावर दुखापत झाली होती. याप्रकरणी मंगळवारी वैष्णवी तायडे हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे हे करीत आहेत.