जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील जळगाव खुर्द पुलाजवळ भीषण अपघात घडला असून रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा हृदयद्रावक प्रकार मंगळवारी (११ मार्च) सकाळी उघडकीस आला.अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.
कसा झाला अपघात?
जळगाव खुर्द गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रस्त्याचे काम सुरू आहे. येथे काम करणारे परप्रांतीय मजूर रात्री लोखंडी पट्टीवर झोपले होते. अंधारामुळे वाहनचालकाला ते दिसले नसल्याने, अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडले.मंगळवारी सकाळी ७ वाजता हा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनेची नोंद करून अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



