मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात महाकुंभातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली होती. अरे हाड, कोण पिणार ते गंगेचे पाणी, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बगला घासत राज ठाकरे यांची नक्कल केली. तसेच त्यांच्या त्या विधानाचे कौतूक करत त्यांच्या डेअरींगला सलामही ठोकला.
राज ठाकरे यांनी महाकुंभातील स्नानावर भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राज ठाकरे यांनी हिंदुंच्या भावना दुखावल्या, असे समाजातील लोकांचे म्हणणे आहे. त्यांच्या या विधानावर विविध राजकीय, अराजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून राज ठाकरे हे टीकेचे धनी झाले आहेत. अशात जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंचे समर्थन केले आहे. शिवाय त्यांनी डेअरिंग दाखवत महाकुंभावर भाष्य केल्यामुळे सलाम देखील ठोकला.
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी जितेंद्र आव्हाड विधिमंडळात पोहोचले. यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंनी महाकुंभातील स्नानाबद्दल केलेल्या विधानाबाबत विचारले. राज ठाकरेंनी महाकुंभावर विधान केले आहे. त्यांनी असे असे केले’, असे म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंप्रमाणेच बगला साफ करण्याची नक्कल केली. हे जर आम्ही केले असते ना, तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे आले असते. घरावर दगडफेक झाली असती. आम्ही देशद्रोहीदेखील ठरलो असतो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, राज ठाकरेंनी त्यांचे मत व्यक्त केले. भारतात सगळ्यांना सगळी मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. किंबहुना मी राज ठाकरेंचे अभिनंदन करेन की, असे हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. हे सगळे बोलायला हिंमत लागते. आपल्या मनातले बोलताना हिंमत लागते. आम्ही कद्रू झालो आहोत. आम्ही षंढ झालो आहोत. आम्ही बोलायला पण घाबरतो. राज ठाकरे त्यांच्या मनातले बिनधास्त बोलले आणि ते कित्येक भारतीयांच्या मनात आहे. त्यांच्या धाडसाला सलाम आहे. बाकी मला यावर काही बोलायचे नाही. राज ठाकरेंच्या धाडसाला सलाम इतकेच मी म्हणेन, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंचे कौतुक करत त्यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.
राज ठाकरे यांनी महाकुंभाविषयी बोलताना बाळा नांदगावकर यांचा अपमान तर केलाच आहे, सोबत अशाप्रकारचे वक्तव्य करुन त्यांनी तमाम स्त्रिया आणि हिंदू भाविकांचाही अपमान केला आहे. या विधानाकरिता राज ठाकरे यांनी कुंभला जाऊन जाहीर माफी मागितली पाहिजे. अशी टीका ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली. राज ठाकरेंनी महाकुंभाविषयी केलेल्या विधानाबद्दल भाजप नेते नितेश राणे यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. प्रयागराजला जाऊन मी आणि माझ्या आईने स्नान केले, आम्हाला कसलाच त्रास जाणवला नाही. आमच्या आस्थेबाबत त्यांनी बोलू नये. असे ते म्हणाले