जळगाव : प्रतिनिधी
रिक्षामध्ये ठेवलेल्या बॅगेमधून वैजयंताबाई कौतिक साळुंखे (७५, रा. चौघुले प्लॉट) यांचे तीन तोळे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाले. ही घटना ७ मार्च रोजी गांधी मार्केटसमोर घडली. या प्रकरणी रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी महिलांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भाजीपाला विक्री करणाऱ्या वैजयंताबाई साळुंके या आठ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे मुलीकडे गेल्या होत्या. तेथून त्या ७ मार्च रोजी जळगावला परतल्या व अजिंठा चौफलीतर उतरुन रिक्षात बसल्या त्या वेळी रिक्षाचालकाने त्यांची बॅग रिक्षात अगोदरच बसलेल्या तीन महिलांच्या पायाजवळ ठेवली. त्यादरम्यान महिलांनी त्या बॅगवर स्कार्फ टाकला होता. गांधी मार्केटसमोरील प्रकाश मेडिकलजवळ उतरल्यानंतर वैजयंताबाईना संशय आल्याने त्यांनी बॅगमध्ये दागिने पाहिले असता त्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १० ग्रॅम वजनाची सोन्याची पांचाळी, ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण ३१ ग्रॅम वजनाचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रिक्षातील तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. किशोर निकुंभकरीत आहेत