बुलढाणा : वृत्तसंस्था
येथील समृध्दी महामार्गावर यवतमाळहून शिर्डीकडे जात असलेल्या क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. यात दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. समृध्दी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉर चॅनेल क्र.३४४.६ वर सिंदखेडराजानजीक माळ सावरगाव शिवारात आज सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्या साबळे आणि मोतीराम बोरकर अशी मृतांची नावे आहेत. क्रुझर गाडी क्र. एमएच २५ आर ३६७९ चे टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी झाली. त्याचवेळी मागच्या बाजूने भरधाव आलेली एक कार या अपघातग्रस्त क्रुझर गाडीवर आदळली. या दुहेरी अपघातात कारच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने त्यातील प्रवासी सुरक्षीत राहीले. अपघातानंतर वाहतूक पोलीस व आपत्कालीन मदत पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना मदत केली.