मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चाही सातत्याने सुरू आहे. त्यातच एकनाथ शिंदेंचे जवळचे मानले जाणारे अजय अशर यांना ‘मित्रा’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरुन हटवण्यात आल्याने पुन्हा या चर्चेने वेग पकडला. मात्र, आमची कामे पाहूनच विरोधकांना अंदाज आल्याने ते नाराज असल्याच्या बातम्या पसरवत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सोबतच, त्यांनी महायुतीत कोणीही नाराज नसल्याचेही स्पष्ट केले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी नाराजी नाट्यावर देखील ते बोलले. ‘सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे जबाबदारी वाढली आहे. आमच्या सरकारने अडीच वर्षात केलेली कामे पाहूनच विरोधकांना पुढील पाच वर्षांचा अंदाज आला आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून नाराज असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, महायुतीमध्ये कोणीही नाराज नाही.’, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेबाबतही माहिती दिली. आश्वासन दिल्याप्रमाणे या योजनेंतर्गत महिलांना दरमहिन्याला 2100 रुपये देणारच आहोत. त्यासाठी आर्थिक आखणी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठं ‘गिफ्ट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र दिला जाणार आहे.